पुणे : संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावर बीआरटी सेवेची सुरुवात केल्यानंतर त्याचे ब्रँडिंग करण्यासाठी बीआरटी मार्गावर एक महिना मोफत सेवा देण्याची घोषणा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी केली होती. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेचे पालन करीत एक महिना मोफत सेवेचा फेरविचार व्हावा, असे पत्र पुणे महापालिकेच्या वतीने पुणे परिवहन महामंडळास (पीएमपी) देण्यात आले आहे. त्यामुळे येत्या बुधवारपर्यंतच बीआरटी मार्गावरून मोफत प्रवास करता येणार आहे.अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संगमवाडी ते विश्रांवाडी या बीआरटी मार्गाचे उद्घाटन ३० आॅगस्ट रोजी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी बोलताना अजित पवार यांनी बीआरटीची एक महिना मोफत सेवा देण्याचा प्रकार अव्यवहार्य असून त्याचा फेरविचार करण्याची सूचना केली होती. बीआरटीचा प्रवास एक महिना उपलब्ध करून दिल्याच्या बदल्यात पुणे महापालिकेला आॅपरेशन लॉस म्हणून २ कोटी रुपये पीएमपी द्यायचे निश्चित करण्यात आले होते. आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेसाठी हा जास्तीचा खर्च वर्गीकरणातून उपलब्ध करून द्यावा लागणार होता.पीएमपी प्रशासनाला मोफत प्रवासाचा फेरविचार करण्याचे पत्र देण्यात आले आहे, सध्याची मोफत सेवा कधीपर्यंत सुरू ठेवायची, याचा विचार महापौर व आयुक्त यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली. पिंपरी-चिंचवडमधील औंध ते रावेत या बीआरटी मार्गाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. या मार्गावर एक महिना मोफत सुविधा देण्यासाठी पीएमपीने पिंपरी-चिंचवडकडे ६ कोटी रुपये आॅपरेशन लॉसपोटी मागितले होते. मात्र पिंपरी-चिंचवडने केवळ दोन दिवस मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे पालिकेनेही मोफत सेवा गुंडाळली आहे.
एक महिना मोफत बीआरटी सेवा होणार रद्द
By admin | Updated: September 5, 2015 03:30 IST