पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून धडक दिलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेनऊच्या सुमारास हडपसरच्या भाजी मार्केटजवळ घडला. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक केली आहे.
संतोष प्रल्हाद तुपे (रा. हडपसर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीचालक रजनीकांत बाबूराव कांबळे (वय २५, रा. माळवाडी, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल काळे (वय ३०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार रजनीकांत दोन मित्रांसह हडपसरमधील भाजी मार्केटमधून जात होता. त्या वेळी त्याने विरुद्ध दिशेने दुचाकी चालवून संतोष तुपे यांना धडक दिली. त्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव तपास करीत आहेत.