पिंपरी : घरगुती वापराच्या छोट्या आकारातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चिखली गावठाण येथे एकाचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. संत तुकारामनगरच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. भगवान दत्तात्रय हिंगे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीत भांड्यांच्या दुकानाच्या गोदामात गॅस सिलिंडरचा साठा आहे. तसेच त्या ठिकाणी घरगुती गॅस भरून देण्याचे काम केले जात होते. त्या वेळी छोट्या आकारातील पाच किलो वजनाच्या छोट्या आकारातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात ज्या ठिकाणी गॅस सिलिंडर ठेवले होते, ते शेड उद््ध्वस्त झाले, शेजारी असलेल्या मिठाई विक्रीच्या दुकानाला आग लागली. त्या वेळी तेथे असलेले भगवान दत्तात्रय हिंगे (वय ४२, रा. चिंचवड) हे गॅस स्फोटात गंभीर जखमी झाले. तर मिठाईच्या दुकानाजवळ थांबलेले दोन जण जखमी झाले. त्यातील एकाचे नाव संतोष साने असे आहे. अन्य एका जखमीचे नाव समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे अधिकारी किरण गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी परिसरातील गॅसटाक्या तातडीने अन्यत्र नेल्या. मिठाईच्या दुकानांवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेले हिंगे हे महापालिकेत सेवेत कार्यरत होते. (प्रतिनिधी)
गॅस स्फोटात एक ठार, दोन जखमी
By admin | Updated: November 14, 2016 03:00 IST