लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी पेंढार : कल्याण-नगर महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेल समोर शनिवारी रात्री (दि.१९) सातच्या सुमारास दुचाकी आणि पिकअप टेम्पोची समोरा समोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
राजेश संजू दहेकर (वय २२, रा. जाचकवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर, मूळ रा. बोरी, ता. चिखलदरा, जि. अमरावती) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जितेन देविदास राजनकर (सध्या रा. जाचकवाडी मूळ वझर, ता. अचलपूर, जि. अमरावती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. राजेश आणि जितेन हे त्यांच्या दुचाकीवरून महार्गाने जात होते. यावेळी पुढून येणाऱ्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात राजेशचा जागीच मृत्यू झाला. तर जितेन जखमी झाला. अपघातानंतर ओतूर पोलीस घटनास्थळी त्वरेने दाखल झाले होते. त्यांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. नगर-कल्याण महामार्गावर धावणारे पिकअप टेम्पो हे नेहमीच भरधाव जात असतात. वाहतूक नियमांचा भंग करून अतिघाईने ओव्हरटेक करताना अपघात होत असल्याने अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
फोटो - अपघातातील वाहने