मंचर : पाय घसरून विहिरीत पडल्याने सोनाजी मारुती पवार (वय ४५, रा. सध्या भावडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी गंगूबाई सोनाजी पवार यांनी पोलिसांना खबर दिली. गुरुवारी सकाळी त्यांचे पती सोनाजी पवार कामानिमित्त दुसऱ्या गावी गेले होते. गंगूबाई त्यांची मुले व सुना यांच्यासोबत भावडी येथील संतोष वाळके यांच्या विहिरीवर कामासाठी गेले. बाहेरगावी गेलेले सोनाजी पवार हे दारू पिऊन परत आले. विहीरमालकाने सर्व मजुरांना जेवणासाठी बोलावले. या वेळी सोनाजी पवार यांना पत्नीने, तुम्ही दारू पिऊन आलात इकडेतिकडे जाऊ नका, अशी सूचना केली होती. विहिरीचे काम किती झाले हे पाहण्यासाठी सोनाजी पवार विहिरीजवळ गेले. त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. यात ते गंभीर जखमी झाले. जखमी पवार यांना उपचारासाठी मंचर रुग्णालयात आणण्यात आले; परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
विहिरीत पडून एकाचा मृत्यू
By admin | Updated: January 14, 2017 03:03 IST