पुणे : धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेता पुण्याच्या पाणीकपातीत काही दिवसांची सवलत देणे शक्य नाही, हे अधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करीत एकदिवसाआड पाणी हे सध्याचे धोरणच कायम करण्याचा निर्णय आज यासंबंधी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी ही माहिती दिली. पालकमंत्री गिरीश बापट, तसेच अन्य काही पदाधिकाऱ्यांनी किमान गणेशोत्सव काळात काही दिवस रोज पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वीत महापौरांच्या उपस्थितीत याबाबत बैठक झाली. त्या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी अशी सवलत देणे शक्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. पाणी वितरणातील तांत्रिक अडचणी व धरणातील घटत चाललेला पाणीसाठा असे कारण त्यासाठी देण्यात आले. महापौरांनी त्यावर दोन दिवसांनी पुन्हा बैठक घेऊ, असे सांगितले होते.त्याप्रमाणे आज बैठक झाली. त्यातही सर्व अधिकाऱ्यांनी रोज पाणी देणे शक्य नाही, असेच स्पष्ट केले. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी नेहमी सोडण्यात येते त्यापेक्षा कमी पाणी नदीपात्रात सोडण्याचेही ठरवण्यात आले. (प्रतिनिधी) शहर परिसरात पाऊस होत असला तरी धरणांच्या क्षेत्रात मात्र पाऊस नाही. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात रोज घट होत आहे. त्यातच काही दिवस सलग पाणी दिले गेले, तर पुढे समस्या निर्माण होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एक दिवसाआड पाणी हे सध्याचेच धोरण कायम ठेवण्याचा निर्णय झाला.
गणेशोत्सवातही एकदिवसाआडच पाणी
By admin | Updated: September 17, 2015 02:49 IST