पुणे : रामबाग कॉलनी येथील वंदन श्री सोसायटीतील दोन सदनिका फोडून १ लाख ५७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी एकाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून ५२ हजार रुपयांची सोन्याची लगड व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलीे असून, उर्वरित १ लाख रुपयांचे दागिने त्याने कोल्हापूर येथे लपविल्याची कबुली दिली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर. निमसे यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रमेश महादेव कुंभार (वय ३७, रा. कऱ्हाड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सोनदत्त श्रीकृष्ण जोशी (वय ५५, रा. रामबाग कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून २०१४ रोजी वंदन श्री सोसायटी, रामबाग कॉलनी, कोथरूड येथे ही घडली. आरोपीने जोशी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील ५२ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली तर त्याच इमारतीत मुकुंद काशीनाथ बडवे यांच्या घराचे लॅच तोडून घरफोडी केली. एकूण १ लाख ५७ हजार ७०० रुपयांची चोरी केली. कऱ्हाड येथून पुण्यात येऊन चारचाकी गाडीचा वापर करून तो चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र चारचाकी कोठून घेतली याबाबत माहिती देत नसल्याने व साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील एस.जे. बागडे यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली. (प्रतिनिधी)
रामबाग कॉलनीतील चोरीप्रकरणी एकास अटक
By admin | Updated: October 13, 2014 06:04 IST