पुणे : किरकोळ वाद झाल्यानंतर मध्यस्थी करणा-या महिला सरपंचाला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी याचा निषेध करून आरोपीला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
सुजित सुभाष काळभोर (रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महिला सरपंचाने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर परिसरातील संभाजीनगर येथील एंजल हायस्कूल परिसरात लसीकरण केंद्र आहे. चार दिवसांपूर्वी लसीकरण केंद्रात अविनाश बडदे आणि आरोपी काळभोर यांच्या नातेवाईकात वाद झाला होता. काळभोरने बडदेला मारहाण केली होती. दोघांमधील वाद सोडवून लसीकरण केंद्रात उपस्थित असलेल्या महिला सरपंचाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काळभोरने महिला सरपंचाला शिवीगाळ करून मारहाण केली.
विनयभंग तसेच मारहाण केल्याप्रकरणी काळभोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली, अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.