घोडेगाव : पोखरी बेंढारवाडी (ता. आंबेगाव) येथील निवृत्त केंद्रप्रमुख वामन गोविंद भवारी (वय ६३) यांचा गळा आवळून, दगडाने ठेचून वाडीजवळच खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. ८) घडली. सोमवारी सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह रानात आढळून आला.वामन भवारी आपल्या पत्नीसमवेत बेंढारवाडीमध्ये राहत होते. रविवारी डिंभे येथे बाजारहाट घेण्यासाठी आले व तेथून पेन्शन केसच्या कामासाठी घोडेगावला आले होते. तेथून सायंकाळी पाच वाजता जीपमधून पोखरीला पोहोचले. पोखरीहून पायी बेंढारवाडीला येताना त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गाडीतून उतरल्यानंतर ते घरी पोहोचले नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी (दि. ९) कुटुंबीयांनी ग्रामस्थांसमवेत दिवसभर आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता सायंकाळी सात वाजता बेंढारवाडीजवळच बाडगीच्या रानात दगडाच्या आडोशाला झाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. याबाबतची माहिती त्यांचा मुलगा सुरेश भवारी यांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्यासह एस. एम. हांडे, एस. सी. भोईर करीत आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. (वार्ताहर)
बेंढारवाडीत वृद्धाचा खून
By admin | Updated: May 11, 2016 01:02 IST