तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पावसाचा अंदाज जाणवत होता, त्याप्रमाणे चार दिवस सतत अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगावसह बहुतांशी गावात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात आरण करून ठेवलेला कांदा भिजल्याने कांदा सडला आहे. तर धना, मेथी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर शेतात काढून ठेवलेली बाजरीची कणसे भिजल्याने बाजरी खराब झाली आहे. तसेच ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अवसरी स्मशान भूमिवरील मुरुमाचा भाराव वाहून गेला आहे. ग्रामपंचायतीने स्मशान भूमीचा परिसराचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करावे म्हणजे वारंवार होणारा मुरूम भरावाचा खर्च होणार नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अवसरी खुर्द (आंबेगाव) येथे मुसळधार पावसामुळे ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्यामुळे स्मशान भूमीवरील मुरुमाचा भराव वाहून गेला आहे.