पुणे /धायरी: मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील सेल्फी पॉइंट परिसरातील ४०० मीटर अंतरात पहाटेपासून ६ तासांत ६ अपघात झाले आहेत. या अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून, ८ जण जखमी झाले आहेत. ह्या अपघातांची मालिका सोमवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटे ४ वाजून २० मिनिटांच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर साताऱ्याच्या दिशेकडून मुंबईच्या दिशेने दारूची वाहतूक करणारा एक ट्रक नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ थांबला असता साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक त्यावर पाठीमागून जाऊन धडकला. या अपघातात ट्रकमधील २ जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात धडक दिलेल्या ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेन च्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत असताना साडेचारच्या सुमारास एक टेम्पो व ट्रक यांचा दुसरा अपघात १०० मीटर अंतरावर घडला. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला. यातील दोन्हीही वाहने साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली होती. पोलिसांनी याठिकाणी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करीत असताना एका कारला ट्रकने साईडच्या बाजूने घासल्याने तिसरा अपघात घडला. दरम्यान भूमकर पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. अशातच एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून ट्रक खाली सेवा रस्त्यावर पडला. यामध्ये सेवा रस्त्यावरून जाणारा एक दुचाकी चालक थोडक्यात बचावला. यामध्ये दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला.
यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांची गाडी तेथून जात असताना त्यांच्या वाहनाला एका कंटेनरने धडक दिल्याने पोलीस गाडीतील एक अधिकारी यात जखमी झाले आहे. दरम्यान एका रिक्षालाही कंटेनरची धडक बसल्याने यामध्ये रिक्षाचालक, प्रवासी महिला व तिचे लहान बाळ होते. यातील रिक्षाचालक व महिला जखमी झाले असून लहान बाळाला किरकोळ दुखापत झाली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा तक्षशिला सोसायटी समोर दोन ट्रक धडकल्याने अपघात झाला मात्र ह्यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे, नितीन जाधव, पोलीस कर्मचारी महेंद्र राऊत, सुशांत यादव, अनिल भोसले,वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघातामुळे पहाटेपासून दुपारपर्यंत या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.