बारामती : निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम अधिकाअधिक गतिमान होण्यासाठी व मतदार नावनोंदणी प्रकिया सोपी करण्यासाठी ‘वोटर मोबाइल ॲप’ विकसित केले आहे. त्यामुळे आता मोबाइलद्वारे मतदार नावनोंदणी होणार आहे.
हे ‘ॲप’ गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. यामुळे मतदारांना मतदार यादीत नवीन नावनोंदणीसाठी नमुना नं. ६ चा अर्ज भरता येतो. यादीतील दुरुस्तीसाठी नमुना नं. ८ अर्ज भरता येतो. मतदार यादीतील स्थलांतरितसाठी नमुना नं. ८ अर्ज भरणे, मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी नमुना नं. ७ अर्ज भरणे, मतदार ओळखपत्र बदलून घेण्यासाठी अर्ज करणे, मतदार नोंदणीसंदर्भात काही अडचण असल्यास ऑनलाइन तक्रार करणे व मतदार यादीतील नाव शोधणे, आदी सुविधा उपलब्ध होतात. मतदारसंघातील सदस्यांची माहितीही मतदारांना या मोबाइल ॲपमुळे उपलब्ध होणार आहे.
तरी मतदारांनी ॲप डाऊनलोड करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.