पुणे : गॅस सिलिंडरची नोंदणी केली नसताना नियमित गॅस न घेणाऱ्या ग्राहकांच्या नावावर परस्पर गॅस नोंदणी करून घरगुती वापराचा गॅस सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या सांगवी येथील वंदना भारत गॅस एजन्सीला जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच संबंधित गॅस एजन्सीची चौकशी करून कडक कारवाई करण्याच्या सूचनादेखील भारत पेट्रोलियम कंपनीला देण्यात आल्या आहेत.सांगवी येथील वंदना भारत गॅस एजन्सीच्या एका ग्राहकाच्या मोबाईलवर गॅस सिलिंडर घेतला नसताना अनुदान जमा होत असल्याचा एसएमएस आला. याबाबत अधिक चौकशी केली असता या ग्राहकांच्या नावावर सवलतीच्या दरातील घरगुती वापराचे गॅस सिलिंडर परस्पर काळ्या बाजाराने हॉटेल व्यावसायिकांना विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहर आणि जिल्ह्यातून अशा प्र्रकार झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्याची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी संबंधित गॅस एजन्सीला कारणे दाखवा नोटीस दिली. एजन्सीवर कारवाई करण्याच्या सूचना भारत पेट्रोलियमला दिल्या आहेत.शासनाने गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी गॅस सिलिंडर आधार व बँक लिंक करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अनुदानाचे पैसे आता थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होतात. परंतु अनेक ग्राहकांना दोन ते तीन महिन्यांसाठी एकच गॅस सिलिंडर लागतो. त्यामुळे काही गॅस एजन्सीने अशा ग्राहकांच्या नावावर परस्पर गॅस सिलिंडर बुक करून त्यांची काळ्या बाजाराने विक्री करण्याची शक्कल शोधून काढली आहे.
गॅस एजन्सीला पुरवठा विभागाची नोटीस
By admin | Updated: August 18, 2015 03:58 IST