पुणे : मुदत संपलेल्या रिक्षा परवानाधारकांना नूतनीकरणासाठी राज्यशासनाने १६ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतीत जे परवानाधारक नूतनीकरण करणार नाहीत, त्यांना नव्याने परवाने देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लॉटरी पद्धतीत अपात्र ठरविण्यात येणार आहे; तसेच नूतनीकरण न करून घेणाऱ्या रिक्षा जप्त केल्या जाणार आहेत; तसेच संबंधित रिक्षाची नोंदणी रद्द करून, कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी शुक्रवारी दिली. रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी ३१ आॅक्टोबर शेवटची मुदत होती; मात्र पुणे शहर वगळता राज्यात इतरत्र रिक्षाचालकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने, तसेच अनेक रिक्षाचालकांना कागदपत्रे संकलित करण्यासाठी वेळ लागत असल्याने शासनाने नूतनीकरणासाठी पुन्हा १६ नोव्हेंपरपर्यत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या रिक्षाचालकांनी परवाना नूतनीकरण करून घेतले नाही. त्यांनी या १५ दिवसांत रिक्षा परवाना नूतनीकरण करुन घ्यावा. असे आवाहन पाटील यांनी केले आहे. २६ आॅक्टोबरपर्यंत शहरात एक हजार ६५ रिक्षाचालकांनी परवाना नूतनीकरण करून घेतले आहे. त्यातून प्रशासनाला सुमारे ५७ लाखांचा महसूल जमा झाला आहे. ११ लाख ५७ हजारांचा कर वसूल झाला आहे. (प्रतिनिधी)
नूतनीकरण नाही; रिक्षा जप्त
By admin | Updated: October 31, 2015 01:17 IST