पिंपरी : घरात बोलायला कोणी नाही, मुलीशी खेळायला कोणी नाही, आपले कसे व्हायचे? अशा विवंचनेत असलेल्या नीलम भामे या महिलेने घरात पोटचा गोळा असलेल्या लावण्या या सहा वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केला. नंतर पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन स्वत: आत्महत्या केली. एकाकीपणामुळे आलेल्या नैराश्यातून आपण हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. मुलीसह पत्नीने स्वत:ला संपविल्याने आता पतीवर एकाकी जीवन जगण्याची वेळ आली आहे. खाली व्यापारी गाळे, वरच्या मजल्यावर निवासी गाळे, आजूबाजूला पेट्रोल पंप, दुकाने, थोडे अंतर पुढे गेल्यास कंपन्यांचा परिसर अशा ठिकाणी कासारवाडीत झेप या इमारतीत भामे कुटुंबीय राहतात. सचिन भामे, पत्नी नीलम, सहा वर्षांची मुलगी लावण्या, तसेच सचिन यांचे आई-वडील असे पाच जण त्या ठिकाणी राहत होते. नीलम आणि सचिन यांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. नीलम हिचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले. त्यांचा संसाराचा गाडा सुरळीत चालला होता. मुलगी लावण्या ही मोरवाडीतील एसएनबीपी शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती.त्याच इमारतीत नीलमचे चुलत सासरेसुद्धा राहत होते. त्यांच्याशी नीलमचे जमत नव्हते. त्यामुळे जवळचे असूनही त्यांच्यात बोलणे होत नव्हते. कामावरून घरी आल्यानंतर सांयकाळी पतीचे संभाषण व्हायचे एवढेच. इतरवेळी कोणी बोलायला नाही, कोणी समजून घेणारे नाही. त्यामुळे मनाची अवस्था एकलकोंडेपणाची झाली. शनिवारी सकाळी नीलमचे पती सचिन हडपसरला कामाला गेले होते. सासू व सासरे औंध येथील दाताच्या रुग्णालयात गेले होते. या वेळी नीलमने मुख्य दरवाजाला आतून कडी लावून शयनगृहात ओढणीच्या साहाय्याने लावण्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन यांना जेव्हा घरात घडलेल्या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. होत्याचे नव्हते झाले असल्याने ते अक्षरश: कोलमडले. दुर्धर आजाराने त्रस्त अथवा कर्जबाजारी झाल्याने संसाराचा गाडा हाकणे कठीण होते. अशावेळी कुटुंबातील सदस्यांना संपवून स्वत: आत्महत्या केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. परंतु, अशा प्रकारच्या वेगळ्याच नैराश्यातून ही घटना घडल्याचे मानले जात आहे. वेगळे काही कारण असू शकते का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
एकलकोंडेपणामुळे घरटे झाले उद्ध्वस्त
By admin | Updated: July 24, 2016 05:27 IST