पुणे : पुण्यातील ६ मीटरचे रस्ते सरसकट ९ मीटरचे करण्याची आमची भूमिका नाही़ मात्र काही भागांपुरते रस्ता रुंदीकरण आवश्यक आहे़ पण ६ मीटर रस्ते ९ मीटर करताना संबंधितांना एफएसआय दिल्याशिवाय रस्ता रूंदीकरण करू नये, हीच आमची भूमिका असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले़
पुणे महापालिकेतील विविध विषयांबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतल्यानंतर पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, मुक्ता टिळक, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते़
पाटील म्हणाले की, नागरिकांची घरे पाडून विनाकारण रस्ता रुंदीची आमची मागणी नाही. राज्य सरकारने ६ मीटर रस्ता रुंदीकरणालाही एफएसआय द्यावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे़ कोरोनामुळे पुण्यातील रखडलेली विकासकामे पुन्हा सुरू होत असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला पाहिजे. या दृष्टीने मेट्रो, मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प, एसआरए आदी प्रकल्प प्राधान्याने हाती घेतले आहेत़
भाजपचे नगरसेवक प्रभागातील कामांचे निमित्त सांगून अजित पवार यांची भेट घेत आहेत़ यावर बोलताना पाटील यांनी, नगरसेवकांनी अशी भेट घेणे यात वेगळे असे काही नाही़ पण मी स्वत: आता प्रत्येक नगरसेवकांशी संपर्कात असून, दर आठवड्याला नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या प्रभागातील कामांचा आढावा घेत आहे़ दरम्यान येत्या ४ व ५ फेब्रुवारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी येथे नगरसेवकांचे शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली़
-----------------------------------------