पुणे : तीन महिन्यांपासून शहरात थैमान घातलेल्या डेंग्यूला अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आणखी कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे डेंग्यूच्या डासांची पैदास आढळल्यानंतर संबधितांकडून दंड न आकारता, त्यांच्यावर थेट खटलाच दाखल करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून दंडात्मक कारवाई करूनही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.सरसकट दंडात्मक कारवाईची मोहीम घेण्याबरोबरच धूरफवारणी, औषधफवारणी, डासांची पैदास शोधणे, ती नष्ट करणे याशिवाय जनजागृती केली जात आहे. मात्र, त्यानंतरही या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. तसेच, महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या जनजागृतीला नागरिकही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन हतबल झाले असून, आता थेट खटलाच दाखल करण्यात येणार आहे. शहरात आत्तापर्यंत २,५००हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून, या आजाराने ८ जणांचा मृत्यू झालेला आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून डेंग्यू हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
दंड नाही, आता थेट खटलाच दाखल
By admin | Updated: September 27, 2014 07:22 IST