पुणे : शहरातील प्रस्तावित मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस ५०० मीटरपर्यंत चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) बांधकाम करण्याची सक्ती नाही. तसेच, २० हजार चौरस फुटांपेक्षा कमी बांधकाम करणाऱ्या छोट्या मिळकतींना व रिकाम्या जागांना सेस लागणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी आज केले. प्रारूप विकास आराखड्यातील तरतुदीनुसार मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला चार एफएसआय देण्याविषयीची नियमावली हरकती-सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये २० हजार चौरस फुटांच्या क्षेत्रासाठी एफएसआयची सक्ती असून, त्याचा वापर न करणाऱ्या मिळकतींना सेस लावण्यात येणार असल्याने संभ्रमावस्था होती. या पार्श्वभूमीवर वाघमारे यांनी मेट्रोमार्गावर चार एफएसआयची सक्ती नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, की मेट्रो झोनमध्ये ज्या जागामालकांचे लहान प्लॉट आहेत. त्यांना नियमाप्रमाणे नियमित एफएसआय वापरून बांधकाम करता येणार आहे. त्यासाठी कोणतेही बंधन नाही. मेट्रो प्रकल्प सक्षमपणे चालविण्यासाठी निधी उभारण्यासाठी चार एफएसआयचा प्रस्ताव आहे. त्यासाठी २० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक बांधकाम असणाऱ्यांना फायदा घेता येईल. बाजारभावानुसार रेडिरेकनरने प्रीमियम घेण्याची तरतूद आहे. प्रारूप आराखड्यातील बांधकाम नियमावलीत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांनंतर मेट्रो झोनमध्ये मोकळी जागा ठेवणे किंवा कमी एफएसआय वापरल्यास ५ टक्के सेस भरावा लागणार असल्याची तरतूद आहे. परंतु, नियमावलीमध्येही सेस भरण्याची तरतूद करता येणार आहे. त्याविषयीची स्पष्ट नियमावली महापालिका जाहीर करणार आहे, असे वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मेट्रो मार्गावर ४ एफएसआयची नाही सक्ती
By admin | Updated: August 15, 2014 00:37 IST