सासवड : पुरंदर तालुक्यातील सर्व गावे शंभर टक्के निर्मलग्राम करण्यात यावीत, हगणदरीमुक्त व्हावीत, यासाठी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने कंबर कसण्यात आल्यानंतर या मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. गुडमॉर्निंग पथकाने केलेल्या कामगिरीमुळे आतापर्यंत तालुक्यातील ९० गावांपैकी ६८ गावे १०० टक्के निर्मलग्राम झाली आहेत. तसेच उर्वरित गावे येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन संपूर्ण तालुका १०० टक्के निर्मलग्राम होईल, अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी दिली. सासवड येथील दादा जाधवराव सांस्कृतिक भवनमध्ये स्वच्छ भारत मिशन - निश्चय २ आॅक्टोबर २०१६ - हगणदरीमुक्त पुरंदर तालुका या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी तालुका हगणदरीमुक्त करण्याची शपथ दिली. पंचायत समितीच्या सभापती अंजना भोर, उपसभापती अनिता कुदळे, माजी उपसभापती माणिकराव झेंडे पाटील, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. काळे, बालविकास प्रकल्पाधिकारी उषा जाधव, त्याचप्रमाणे पंचायत, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पशुसंवर्धन व इतर विभागांचे विस्तार अधिकारी, कर्मच७ारी, तसेच तालुक्यातील अंगणवाडीसेविका, मदतनीस, आरोग्यसेविका, मदतनीस, प्राथमिक शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख आदी उपस्थित होते. तालुक्यातील गावांमध्ये १५ आॅगस्ट २०१६ पूर्वी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले होते. स्वच्छतागृहे ठरलेल्या काळात पूर्ण न झाल्यास संबंधित कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान देण्यात येणार नाही, कोणतेही दाखले देण्यात येणार नाहीत, अशा व्यक्तींना कोणत्याही बँकेचे कर्ज मिळू नये, यासाठी बँकांना पत्रव्यवहार करण्यात येईल, यांसारख्या अनेक कारवाया प्रशासनातर्फे करण्यात येणार होत्या.याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवक किंवा संपर्क अधिकारी यांच्याबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल, तलाठी, पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यावर होती. त्यानंतर १५ आॅगस्टच्या ग्रामसभेमध्ये त्याप्रमाणे सर्व ठराव मंजूर करण्यात आले. मात्र ठराव मंजूर होऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच स्थानिक पातळीवर अनेक ग्रामपंचायतींकडून फारसा पाठपुरावा करण्यात आला नाही, तर काही गावांमधून ग्रामपंचायतीने पाठपुरावा करूनही अनेक नागरिकांनी केवळ विरोध किंवा त्रास देण्याच्या हेतूने शौचालयाचे बांधकामच केले नाही. त्यामुळे अनेक गावे आजही निर्मलग्राम होण्यापासून वंचित आहेत. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. नवरात्रोत्सवादरम्यान तसेच दिवाळीदरम्यान गॅस अथवा वीज कनेक्शन बंद केल्यास संबंधित कुटुंबांची अडचण होईल, तसेच किराणा अथवा रॉकेल न दिल्यास त्यांची अडचण वाढेल. ही समस्या लक्षात घेऊन पंचायत समितीने दिवाळी होईपर्यंत कारवाई पुढे ढकलली होती. मात्र यादरम्यानच्या काळात नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तहसीलदार सचिन गिरी, पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे व इतर विस्तार अधिकारी यांची एक मीटिंग होऊन यामध्ये ‘गुडमॉर्निंग’ पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे पथक स्थापन करण्यात येऊन बुधवारपासून दि. ९ नोव्हेंबर २०१६ पासून ते संपूर्ण तालुक्यात कार्यरत झाले. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी असे पथक नेमून रस्त्यावर अशी व्यक्ती शौचास बसलेली आढळून आल्यास थेट पोलीस कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले. (वार्ताहर)
पुरंदर तालुक्यातील ६८ गावे निर्मल
By admin | Published: January 23, 2017 2:30 AM