येरवडा : विमाननगरमधील आनंद विद्यालयात दहावीच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिका नववीतील मुलींकडून तपासून घेतल्याप्रकरणी शाळेकडून शिक्षकाला नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला आहे. विमाननगरमधील आनंद विद्यानिकेतन विद्यालयात हा प्रकार घडला असून, विद्यालयातील शिक्षक दशरथ बेल्हेकर हे दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्याथिर्नींंकडून तपासून घेत असल्याची माहिती क्रांतिवीर लहुजी टायगर महासंघाचे अध्यक्ष श्रावण वायदंडे यांना समजली. त्यांनी गुरुवारी (दि. १९) विद्यालयात जाऊन पाहणी केली असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आपल्याकडील मोबाईलवर या प्रकाराचे चित्रण करून प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली. बेल्हेकर या विद्यालयात हिंदीचे शिक्षक असून, या संस्थेचे आजीव सभासद आहेत. तसेच अलीकडील काळात त्यांची या विद्यालयाच्या संस्थेवर विश्वस्त म्हणून नेमणूक झाली आहे. बेल्हेकर यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आले असून,तेथेच ते नववीच्या ३ विद्यार्थिनींकडून दहावीच्या हिंदीच्या उत्तरपत्रिका तपासून घेत होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या सचिव किरण तावरे म्हणाल्या, की बेल्हेकर यांनी विद्यार्थिनींकडून उत्तरपत्रिका तपासून घेतलेल्या नाहीत. या उत्तरपत्रिका त्यांनी स्वत: तपासून मॉडरेटरकडे सोपविल्या होत्या. एकूण गुणांच्या बेरजांमध्ये किरकोळ चुका होत्या, त्यामुळे मॉडरेटरने पुन्हा या उत्तरपत्रिका बेल्हेकर यांच्याकडे देऊन चुका दुरुस्त करण्यास सांगितले. बेल्हेकर यांनी विद्यार्थिनींना कार्यालयात बोलावून गुणांच्या बेरजा तपासण्यास सांगितले होते. तरीही हा प्रकार चुकीचा आहे. संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांसमोर बेल्हेकर यांना बोलावून खुलासा मागवला आहे. शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशराज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्रसारमाध्यमांकडून याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर तावडे यांनी संबंधित घटनेत दोषी असलेल्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दहावी उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या नववीच्या विद्यार्थिनींकडे
By admin | Updated: March 22, 2015 00:49 IST