शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेबाबत जयंतीलाल कांतीलाल ओसवाल (वय ४१, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. ओसवाल यांचे उरुळी कांचन येथे अमृता ज्वलर्स हे सोने चांदी विक्रीचे दुकान आहे. सोने-चांदीचे दागिने इतर सोनारांना पुरवठा करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. ते दर गुरुवारी हे दागिने इतर सोनारांना पुरवठ्याचे काम करतात. साधारणतः दहा वर्षांपासून हे काम ते काष्टी, श्रीगोंदा परिसरात करीत आहेत. नेहमीप्रमाणे ते गुरुवार (दि.२५) रोजी या परिसरातील कामकाज संपवून उरुळी कांचन येथे घरी जाण्यासाठी निघाले असता सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
यावेळी तीन जणांनी दुचाकीवरून येऊन ९,२०,००० रुपये किंमतीच्या सोने चांदीच्या दागिन्यांची लूट केली आहे. या वेळी बचावासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. सदर चोरट्यांनी नंबर प्लेट नसलेली दुचाकी या गुन्ह्यासाठी वापरली आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्यातील योगेश दिगंबर पालकर (रा. तांदळी, ता. शिरूर) याला शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सदर सोनाराला आरोपींनी पाळत ठेवून लुटल्याची चर्चा आहे.
पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत, योगेश गुंड हे करीत आहेत.