देहूरोड : गेल्या बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दोन कंत्राटदारांना दिले आहेत. त्यानुसार आगामी १८ महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. रस्त्याचे चौपदरीकरण व एलिव्हेटेडसाठी मिळून ८२ कोटी २६ लाख १३ हजार ८९२ रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. एकेकाळी सर्वाधिक वर्दळीचा समजला जाणाऱ्या या रस्त्याचे काम विविध कारणांनी १२ वर्षांपासून रखडले होते. गेल्या वर्षी रस्ते विकास महामंडळाचे मुंबई कार्यालयातील मुख्य कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी देहूरोड येथील सर्वपक्षीय आंदोलनाच्या दरम्यान निगडी ते देहूरोड चौपदरीकरण व देहूरोड येथील लोहमार्गावरील उड्डाणपूल तसेच बाजार भागातून डॉ . बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयापर्यंत एलिव्हेटेड रस्ता बनविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यानुसार या दोन्ही कामांसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सल्लागार संस्थेची नेमणूक करण्याची निविदा प्रथमच प्रसिद्ध करण्यात आली होती. महामंडळाने सल्लागार संस्थेची नेमणूक केल्यांनतर महामार्गावरील निगडीतील भक्ती -शक्ती चौक ते देहूरोड पोलीस ठाण्याजवळील सेंट्रल चौक (किमी. २०.४०० ते किमी. २६.५४०) दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण कामाच्या मुख्य निविदा प्रक्रियेला महामंडळाकडून चालू वर्षी चार मेला सुरुवात करण्यात आली होती. (वार्ताहर)- रस्ता व पुलाच्या कामासाठी प्रत्येकी चार ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. चौपदरीकरण कामासाठी मुंबईतील पीबीए इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदाराची ३९ कोटी ६ लाख १३ हजार ८९२ रुपयांची व लोहमार्गावरील उड्डाणपूल व एलिवेटेड रस्त्यासाठी पुण्यातील मे टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ४३ कोटी २० लाख रुपयांची निविदा स्वीकारण्यात आली आहे.
निगडी-देहूरोड चौपदरीकरण मार्गी
By admin | Updated: October 28, 2016 04:36 IST