वडगाव मावळ : आंबी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंगरूळ आंबळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकल्पाची २००० मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यातून आंबी, मंगरूळ, गोळेवाडी, दरेकरवस्ती व इस्सार स्टील कंपनी इत्यादी ठिकाणी दिवसाला सरासरी २ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रति हजार लिटर पाण्याला १३ रुपये ५० पैसे आकारण्यात येतो. या प्रकल्पावर नियमित ३ कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्या विश्रांतीसाठी विश्रांतीगृह, स्वच्छतागृह नाही. या प्रकल्पाला संरक्षक कुंपण नसल्याने प्रकल्पाजवळ मोकाट कुत्रे, जनावरांचा ठिय्या असतो. प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. परिसरातील जनावरे पाणी उपसा होत असलेल्या विहिरीजवळील पाण्यात बसतात. त्यामुळे पाणी दूषित होते. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन व तुरटीचे प्रमाण अधिक लागते. प्रकल्पाला दोन वर्षांपासून पंप हाऊसमध्ये एकच पंप सुरू आहे. तो बंद पडल्यास पर्यायी पंप नसल्याने पाणीपुरवठा खंडित होतो. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कर्मचार्यांची मोठी दमछाक होते. या प्रकल्पाचे लोखंडी पाईप गंजलेले असून, त्यांची दुरवस्था झाल्याने शुद्ध पाणी वाया जात आहे. इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी वाढून पाणी दूषित झाले आहे. प्रकल्पातील गोदामाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. भिंतीला काजळी चढलेली आहे. या प्रकल्पाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच वामन वारिंगे, सुरेश घोजगे, दत्ता कानकुडे, नानासाहेब घोजगे, नंदकुमार घोजगे व ग्रामस्थ करीत आहेत.(प्रतिनिधी)
पाणी योजनेला हवी नवसंजीवनी
By admin | Updated: May 24, 2014 05:18 IST