खोडद : ‘बुद्धलेण्या या बौद्धसंस्कृतीचा आणि बुद्ध विचारांचा हा प्राचीन वारसा आहेत. बुद्धलेण्यांचे हे वैभव जपणे, टिकविणे ही आपली जबाबदारी आहे. हा वारसा अनेकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. बुद्धलेण्यांना केवळ पर्यटनाच्या उद्देशाने भेट देऊन बौद्ध संस्कृती समजणार नाही, बौद्ध संस्कृती समजून व जाणून घेण्यासाठी बुद्धलेण्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन लेणी व पाली भाषेचे अभ्यासक सुनील खरे यांनी केले.
महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन आणि संशोधन संस्थेच्या वतीने (एमबीसीपीआर) जुन्नर तालुक्यातील तुळजा व सुलेमान बुद्ध लेणीमध्ये लेणी अभ्यासकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनील खरे बोलत होते. या वेळी सुनील खरे म्हणाले, ‘तथागत बुद्धांनी सुमारे २ हजार ५०० वर्षांपूर्वी कर्मसिद्धांत मांडला आहे. तो आजही तंतोतंत मानवाला लागू होत आहे. त्याकाळी बौद्ध भिक्खूंनी गावागावांत जाऊन मानवतेचा प्रचार केला. भिक्खूंनी त्याकाळी या बुद्धलेण्यांचा अभ्यासासाठी, ध्यानधारणेसाठी आणि निवासासाठी वापर केला. थेरवाद परंपरेत बुद्धांची पूजा करण्यासाठी प्रतीकांचा वापर केला जायचा. त्यापैकीच एक असलेल्या स्तूपाच्या प्रतिकाची पूजा ही बुद्धपूजा म्हणून केली जायची.
या कार्यशाळेसाठी नाशिकमधून सुनील खरे व त्यांचे इतर सहकारी, पुण्यातून रुपाली गायकवाड व मनोज गजभार यांचे पथक, कल्याण मधून प्रभाकर जोगदंड व संतोष वाघमारे, रुपाली गायकवाड, नीता निकाळजे, संतोष वाघमारे, प्रभाकर जोगदंड, प्रवीण जाधव, रितेश गांगुर्डे, संतोष अंभोरे, शशिकांत निकम, विकास खरात, मनोज गजभार, महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन समूहाचे कविता खरे, गौतम कदम, विजय कापडणे, आनंद खरात, व इतर लेणी अभ्यासक उपस्थित होते.
सर्व लेणी अभ्यासक लेणींवर पोहचल्यानंतर चैत्यगृहाची स्वच्छता केली. चैत्यस्तुपाच्या भोवताली फुलांची सजावट केली. सामूहिक त्रिसरण, पंचशील गाथा व बुद्ध वंदना घेऊन बुद्ध लेणी व शिल्पकला संदर्भात माहीती दिली. या दोन्ही लेणीसमूहांवर असलेली बुद्ध शिल्पकला या कार्यशाळेत लेणी अभ्यासकांनी समजून घेतली.कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या अभ्यासकांना सुनील खरे, प्रभाकर जोगदंड व प्रवीण जाधव यांनी मार्गदर्शन केले.
कोट
तुळजा लेणीमधील शिल्प व चैत्यस्तूप पाहिल्यानंतर ही बौद्ध लेणी आहेत हे लक्षात येते. चैत्यस्तुपास बॅरिकेट बसवण्याची मागणी आम्ही पुरातत्त्व विभागाकडे करणार आहोत. यापुढे कोणत्याही बुद्धलेणीमध्ये अतिक्रमण होणार नाही यासाठी एमबीसीपीआर संस्था नक्कीच प्रयत्न करणार आहे.
- प्रभाकर जोगदंड, कार्यकर्ते
महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन समूह
फोटो जुन्नर तालुक्यातील तुळजा व सुलेमान बुद्धलेणीत आयोजित कार्यशाळेत लेणी अभ्यासकांनी सहभाग घेतला.