पुणे : लहान मुलांसाठी कवितांची शिबिरे, वाचनाचे कार्यक्रम, साहित्यिकांशी संवाद साधणे, असे अनेक उपक्रम शाळांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्यामुळे सरसकट बालसाहित्य विश्वात मुलांसाठी काहीच होत नाही, हा समज चुकीचा आहे. केवळ आसपास डोळस वृत्तीने पाहण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था आणि ऊर्मी संस्थेतर्फे मारूंजी (ता. मुळशी) येथे होणाऱ्या २६व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. मुलांसाठी सातत्याने काम करणारी कवयित्री म्हणून नावलौकिक असलेल्या संगीता बर्वे यांनी ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रान फुले’, ‘झाड आजोबा’, ‘खारूताई आणि सावलीबाई’, ‘हुर्रे हूप’ या काव्यसंग्रहासह एकांकिका, ललितलेखनाच्या माध्यमातून साहित्य विश्वात स्वत:चा ठसा उमटविला आहे. मुलांसाठी ‘गंमत झाली भारी’, ‘या रे या सारे गाऊ या’ अशा कार्यक्रमांचे सादरीकरणही त्या करतात. इयत्ता दहावीच्या पुस्तकामध्ये ‘मल्हारची धून’ या त्यांच्या कवितेचाही समावेश आहे. ‘आकाश कवितेचे’ या शिबिरातून पूर्वसूरींच्या कवितांची ओळख करून देत मुलांना काव्यनिर्मितीस त्या प्रवृत्त करतात. मुलांचा कल वाचनाकडे वळविण्यासाठी भाषेची गंमत काय असते, हे त्यांना आधी सांगण्याची गरज आहे. घर तिथे शौचालयासारखे शाळा तिथे ग्रंथालय ही संकल्पना रुजविण्याची गरज आहे. आज मुलांच्या हातात सरसकट मोबाईल दिले जातात, पण पुस्तके दिल्यावर फाटेल म्हणून त्यांना ओरडले जाते, त्यामुळेच पुस्तकांपेक्षा त्यांची मोबाईलशी अधिक मैत्री झाली आहे. यासाठी पालकांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आज बालसाहित्य पोहोचले नसले,तरी शाळांमध्ये साहित्याची गोडी मुलांना लागावी यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. (प्रतिनिधी)प्रगल्भ जाणिवा तयार होतील१ बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, की बालकुमार साहित्य संमेलन म्हणजे मुलांची गर्दी, असे चित्र खरेतर असता कामा नये. २ ज्या मुलांना कथा, कादंबऱ्या वाचनाची आवड आहे, अशा मुलांची शाळांमधून निवड करून अशा मुलांना संमेलनात बोलवायला हवे. ३ साहित्याची आवड असणाऱ्या मुलांची संमेलने झाली, तर त्यांच्यामध्ये साहित्याच्या प्रगल्भ जाणिवा विकसित होतील आणि संमेलनाला खऱ्या अर्थाने अभिजाततेचे स्वरूप प्राप्त होईल.
डोळस वृत्तीने पाहण्याची गरज
By admin | Updated: February 5, 2015 00:16 IST