न्हावरे : सर्वधर्मीयांच्या ऐक्याचे प्रतीक असलेली न्हावरे येथील भैरवनाथ व पिरसाहेब यात्रा छबिना, संदल मिरवणूक, जंगी कुस्त्यांचा आखाडा यांसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडली.दरम्यान, शासनाने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्याने यात्रेसाठीच्या खर्चावर ग्रामस्थांनी मर्यादा घालून घेतल्याने दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी यात्रेतील गर्दीत घट असल्याचे जाणवले.न्हावरे येथील भैरवनाथ व पिरसाहेब यात्रेनिमित्त मल्लिकार्जुन मंदिर, भैरवनाथ मंदिर, पिरसाहेब दर्गा परिसर व गावातील मुख्यपेठ, ग्रामपंचायत व्यापारी संकुल येथे आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी ‘श्री’चा छबिना व पिरसाहेबांच्या संदलची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत परिसरातील लेझिमचे व गजनृत्याचे अनेक संघ सहभागी झाले होते. त्याचबरोबर या वेळी करण्यात आलेल्या धार्मिक विधीत सर्वधर्मीय बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी हाजेऱ्याचा कार्यक्रम झाला. दुपारी भैरवनाथ मंदिरासमोर जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. या आखाड्यात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले सुमारे ३०० नामवंत मल्ल सहभागी झाले होते.
न्हावरेत छबिना, संदल मिरवणूक
By admin | Updated: November 17, 2016 02:03 IST