पुणे : भारताला साहित्य आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा लाभली आहे. प्राचीन काळचे ग्रंथ, पोथ्या यांतील ज्ञान नव्या पिढ्यांपर्यंत हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने ग्रंथांचे जतन आणि संवर्धन महत्त्वाचे मानले जाते. पुण्यातील वेदभवनामध्ये २००-३०० वर्षांपूर्वीच्या पोथ्यांचे नैसर्गिक पद्धतीने जतन करण्यात आले आहे. सापाची कात वापरून पोथ्यांच्या संरक्षणाची अनोखी पद्धत अवलंबली जात आहे.भारताला प्राचीन काळापासून गुरुकुल परंपरा रूढ आहे. शास्त्रानुसार, पूर्वीच्या काळी गुरुगृही अध्ययन केल्यानंतर आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवावे, असा दंडक होता. त्यानुसार अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असे. एखाद्याला हे ज्ञान उद्धृत करणे न जमल्यास, लेखनाच्या माध्यमातून आपल्याला अवगत झालेल्या ज्ञानाची पोथी तयार करून ती विद्यार्थ्यांना दान देण्याची पद्धत होती. अशाच शेकडो वर्षांपूर्वीच्या पोथ्या जतन करण्यात आल्याची माहिती मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.याबाबत घैसासगुरुजी म्हणाले, ‘‘सध्या डिजिटायझेशनची पद्धत रूढ झाली आहे. मात्र, डिजिटायझेशन करण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. ही पद्धत अनैसर्गिक असल्याने काही काळाने कागद पिवळा पडण्याची शक्यता असते. याउलट, प्राचीन पोथ्यांमध्ये सापाची कात ठेवल्यास त्या अनेक वर्षे जशाच्या तशा टिकून राहतात. त्याच्या कागदाचा, शाईचा दर्जा यत्किंचितही खालावत नाही. पोथ्यांना कसर लागत नाही.’’वेदभवनामध्ये सापाची कात वापरून सुमारे १०० पोथ्यांचे नैसर्गिक पद्धतीने जतन करण्यात आले आहे. या पोथ्या पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात, असेही ते म्हणाले.
नैसर्गिक पद्धतीने पोथ्यांचे जतन
By admin | Updated: January 23, 2017 03:05 IST