लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दरवर्षी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. एकत्रित येत नमाज पठण करून हे बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात. मात्र, कोरोना संकटांमुळे सर्वच सण, उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे रमजान ईद सार्वजनिकरित्या साजरी न करता अत्यंत साधेपणाने ईद साजरी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यात शुक्रवार (दि.१४) रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. परंतु, पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक कडक निर्बंध लागू केले आहे. त्याची अंमलबजावणी देखील पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या परिस्थितीत मुस्लिम बांधवांची रमजान ईद साजरी होत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन नियमावली जाहीर केली आहे. तिचे पालन करणे मुस्लिम बांधवांना बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट केले.
यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण आणि इफ्तारसाठी मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साधेपणाने साजरे करावेत. राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. ईदनिमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळ बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, असे स्पष्ट केले.