पुणे : पूर्ववैमनस्यातून दगड, फरशीने डोक्यात मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे़ ही घटना पौड रस्त्यावरील मोरे श्रमिकनगर येथे रविवारी रात्री घडली. साजन विनायक जगताप (वय २२, रा. काळेवाडी, कोथरूड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे़ अक्षय साठे (रा. मोरे श्रमिक वसाहत, पौड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून, इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी जगतापचा मित्र अविनाश वाजे (वय २३, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. जगताप व साठे हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर शरीराविरुद्धचे व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत़ त्या दोघांत काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अविनाश वाजे हे त्यांचे मित्र साजन जगताप यांच्यासह रविवारी रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून जात असताना अक्षय साठे व त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना अडविले़ दोघांना शिवीगाळ करून त्यांनी जगताप यांना दगड, विटा, फरशीने डोक्यात व इतर ठिकाणी जबर मारहाण केली़ त्यात जगताप हे जबर जखमी झाले आहेत़ वाजे यांनाही दगड लागल्याने ते जखमी झाले आहे़ पोलिसांनी साठेला अटक करून इतर तिघांचा शोध सुरू आहे़ (प्रतिनिधी)
पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला
By admin | Updated: November 15, 2016 03:54 IST