सासवड : नागरिक आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने सासवड नगरपालिका प्रगतिपथावर असून यापूर्वी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या संत गाडगेबाबा नगर स्वच्छता अभियान तसेच केंद्र शासनाने सुरु केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८, २०१९ आणि २०२० मधेही सासवड नगरपालिका देशात अव्वल राहिली आहे. २०२१ च्या स्वच्छ सर्वेक्षणातही पालिका सर्वांच्या सहभागाने देशात अव्वल राहील असा आशावाद आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.
सासवड नगरपालिकेचा १५२ वा वर्धापन दिवस सोमवारी ( दि ४ ) पालिकेत साजरा करण्यात आला. यानिमित्त पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे " शिक्षण व सहकार महर्षी मा ना चंदुकाका जगताप सासवड नगरपरिषद प्रशासकीय इमारत" असे नामकरण करून नूतनीकरण केलेल्या इमारतीचे तसेच संगमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण आ. संजय जगताप यांच्या हस्ते व नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्षा निर्मला जगताप आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी संत सोपानकाका महाराज संजीवन समाधी मंदिर तेे वाघ डोंगर रस्त्याला दिवंगत लोकनेते चंदुकाका जगताप मार्ग तसेच छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरील प्रांगणाला शिवतीर्थ चौक आणि सासवड-कोंढवा रस्त्यावरील पोलीस लाईनजवळील चौकाला महापराक्रमी श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप चौक असे नामकरण करण्यात आले. तसेच वैकुंठ स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्यात आली.
याप्रसंगी नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, संदीप जगताप, विजय वढणे, मनोहर जगताप, प्रवीण भोंडे, बाळासो पायगुडे, संजय चौरे, नगरसेविका पुष्पा जगताप, वसुधा आनंदे, माया जगताप, मंगल म्हेत्रे, सीमा भोंगळे, विद्या टिळेकर तसेच यशवंत जगताप, पालिकेचे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर जगताप यांनी केले तर आभार नगरसेवक संजय ग जगताप यांनी मानले.
०७ सासवड
सासवड नगरपालिकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमदार संजय जगताप, मार्तंड भोंडे, आनंदीकाकी जगताप, विनोद जळक व पदाधिकारी.