हणमंत पाटील, पुणेमहापालिका प्रशासनाने शिक्षण मंडळांच्या शाळेतील मैदाने व वर्गखोल्यांची भाडेआकारणी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांना २० ते १०० पटीने वाढविली आहे. महापालिकेने मैदानांचा बाजार मांडल्याने सामाजिक संस्थातर्फे विद्यार्थ्यांसाठी चालविले जाणाऱ्या क्रीडा व अभ्यासवर्गांना खीळ बसली आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील गोरगरीब विद्यार्थी व्यक्तिमत्त्वविकास उपक्रमांपासून वंचित राहत आहेत.पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. इथे शाळा व विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, शहरातील जागांचे भाव गगनाला भिडल्यामुळे मोकळ्या जागा व मैदानांची संख्या कमी झाली आहे. शहरात महापालिकेच्या सुमारे ३१० प्राथमिक शाळा आहेत. मात्र, दोन ते तीन शाळांमध्ये एक अशा प्रकारे मैदानांची संख्या १२० इतकी आहे. शिवाय शहरात क्रीडा प्रशिक्षण व विविध व्यावसायिक कार्यक्रमांसाठी मैदानांची मागणी वाढलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अचानकपणे शिक्षण मंडळाच्या शाळेच्या खोल्या, मैदाने व सभागृहांचे भाडे वाढविण्याचा निर्णय १६ मे रोजी घेतला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी चालविले जाणारे क्रीडा प्रशिक्षण, अभ्यासवर्ग व व्यक्तिमत्त्वविकास उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे शिक्षण मंडळाचे सदस्य व अधिकाऱ्यांनाही त्याचा कोणताही पत्ता नसल्याची बाब पुढे आली आहे. शाळेतील मैदाने व वर्गखोल्या भाड्याने देण्याचे महापालिकेचे आतापर्यंत कोणतेही धोरण नाही. मात्र, शाळांच्या वर्गखोल्या, हॉल व मैदाने यांना एक ते ३० दिवसांसाठी विविध कार्यक्रमांसाठी मागणी असते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कार्यालयीन आदेश काढले आहेत. त्यानंतर शहरातील विविध १८ संस्थांनी या भाडेवाढीवर आपेक्ष घेतला आहे. भाडेवाढीमुळे गोरगरीब विद्यार्थी व्यक्तिमत्त्वविकासापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याविषयी शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकारी शिवाजी दौंडकर व बबन दहिफळे म्हणाले, की महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्पष्टीकरण तेच देऊ शकतील. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महापालिकेने मांडला मैदानांचा बाजार
By admin | Updated: August 10, 2015 02:45 IST