पुणे : ''म्युकरमायकोसिस'' या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या आजारावरील उपचारांकरिता तीन लाखांपर्यंत पालिका मदत करणार आहे. शहरातील १४० रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार घेता येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पालिकेकडून शहरी गरीब योजना राबविली जाते. एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो. वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये दिले जातात, तर अन्य गंभीर आजारासाठी तीन लाख रुपये देण्यात येतात. शहरात या योजनेचे २० हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्यास उपचारासाठी तीन लाखांपर्यंतचा निधी दिला जाणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या वाढत गेली. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यातच अनेक रुग्णांवर भरमसाठ औषधांचा मारा करण्यात आला. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. बुरशीजन्य आजार वाढू लागला आहे. त्यापासून संरक्षणासाठी पालिका प्रशासाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
----
शहरामध्ये सध्या म्युकरमायकोसिसचे १६७ रुग्ण आहेत. यापैकी पुणे शहरातील मूळ रुग्णांची संख्या ८६ आहे. आत्तापर्यंत या रोगामुळे १३ नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनानंतर या रोगाची लागण होत असल्याचे समोर आल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
- मुरलीधर मोहोळ, महापौर