पुणे : अगोदरच्या ३४ गावांचे पुणे महापालिकेत जाण्याचं भिजत घोंगडं असताना हवेलीतील आणखी चार गावांना महापालिकेत यायचं आहे. तसे ग्रामसभेचे ठराव त्यांनी जिल्हा परिषदेला दिले असून बुधवारी झालेल्या स्थायी समितीत तसा ठराव आज मांडण्यात आला.१९९७ मध्ये सरकारने पुण्याच्या आसपासच्या ३४ गावांचा समावेश पालिका हद्दीत केला. यातील काही गावांमधून पालिका नको, अशी मागणी सुरू झाली. त्यामुळे २००१ मध्ये राज्य सरकारने विशेष आदेश काढून मांजरी, मुंढवा (केशवनगर), उंड्री, पिसोळी, साडेसतरानळी, लोहगाव, शिवणे, बावधन, सूस आदी २४ गावे पालिका हद्दीतून वगळली. पुन्हा त्या काही गावांनी महापालिकेत जाण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने मे २०१४ रोजी गावे महापालिकेत घेण्याची अधिसूचनाही काढली आहे. मात्र अंतिम अधिसूचना न काढल्याने अद्याप हा निर्णय झाला नाही.त्यामुळे हवेलीतील या गावांच्या शेजारील आणखी चार गावांनी महापालिकेत जाण्याचे ठरविले आहे. यात वडकी, आव्हाळवाडी, नांदोशीमधील सणसनगर व मांजरी या गावांना ग्रामसभेत ठराव करून जिल्हा परिषदेकडे पाठविले आहेत.सध्या शहरालगतची ३४ गावे समाविष्ट करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. ही गावे महापालिकेत गेल्यानंतर त्या परिसरात आमची एकमेव ग्रामपंचायत राहत आहे. त्यामुळे विकासकामात मोठा असमतोल राहील. लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याने गावं बकाल होतील. एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर ग्रामपंचायतीमार्फत सर्वदूर विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे आम्हाला महापालिकेत घ्यावे, अशी त्या गावांची मागणी आहे. ज्या गावांना महापालिकेत जायचेय त्यांना आम्ही अडवू शकत नाही. त्यांच्या मागणीप्रमाणे ठराव करून आम्ही तो शासनाकडे सादर करेल, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हवेलीतील आणखी चार गावांना जायचंय महापालिकेत
By admin | Updated: December 24, 2015 00:46 IST