संपूर्ण विश्वात पसरलेल्या कोरोना महामारीचा नायनाट कर, लवकर लस उपलब्ध होऊ दे, सर्वाना चांगले आरोग्य मिळू दे, यंदा पाऊसपाणी चांगला होऊ दे, बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
नववर्षाच्या निमित्ताने रविवारी (दि. ३) खासदार अमोल कोल्हे आपल्या परिवारासह जेजुरीगडावर आले होते. दुपारी त्यांनी विधिवत पूजा-अभिषेक करीत कुलधर्म कुलाचार केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीमहाराज मालिकेने अवघ्या जगभरात अभिनेता म्हणून ओळख झाली. पुढील काळात महात्मा फुले, नरवीर उमाजीराजे नाईक या महापुरुषांसह अण्णा भाऊ साठे यांच्या "फकिरा" कादंबरीतील व्यक्तिरेखा करायची इच्छा असल्याचे खासदार कोल्हे म्हणाले. देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, माजी विश्वस्त सुधीर गोडसे यांच्या वतीने खा. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.