पुणे : विसर्जन मिरवणुकीमध्ये मोबाईल चोरट्यांची चांगलीच चंगळ झाली असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल २५० मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद करण्याचे काम सुरू होते. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून तक्रार देण्यासाठी न आलेल्यांची संख्याही मोठी आहे. चोरट्यांच्या हातचलाखीचा फटका शिवाजीनगर न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनाही बसल्याचे समोर आले असून सुरुवातीला त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना त्यांनी ओळख सांगितल्यावर तक्रार दाखल झाली. रविवारी सकाळपासूनच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लक्ष्मी रस्त्यासह शहराच्या मध्यवस्तीतील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची गर्दी उसळली होती. या गर्दीमध्ये आबालवृद्धांचा सहभाग होता. तरुण-तरुणी, आयटीयन्स, महाविद्यालयीन तरुणांसोबत अनेक जण कुटुंबासोबत मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांवर उभे होते. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल लंपास केले. दुपारपासूनच सुरू झालेल्या मोबाईल चोरीच्या घटना संध्याकाळनंतर मोठ्या प्रमाणावर वाढल्या. अनेक जण पोलीस मदत केंद्रावर जाऊन मोबाईल चोरी झाल्याच्या तक्रारी देत होते. मात्र त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये पाठविण्यात येत होते. त्यामुळे तक्रारदारांचा वेळ खेटे घालण्यातच जात होता.------------माझा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी मी एका पोलीस चौकीमध्ये गेलो होतो. त्यांनी मला फरासखाना पोलीस ठाण्यात पाठवले. पोलीस ठाण्यात गेल्यावर पुन्हा चौकीमध्ये पाठवण्यात आले. शेवटी न राहवून मी स्वत:ची ओळख सांगितली. माझे ओळखपत्र दाखवल्यावर त्यांनी मोबाईल चोरीची तक्रार दाखल करून घेतली. सर्वसामान्यांना होणारा त्रास आज स्वत: अनुभवल्यामुळे पोलीस लोकांशी कसे वागतात, याचाही अनुभव आला. मोबाईल कंपनीला पोलीस तक्रारीची प्रत देऊन जुने सिमकार्ड बंद करून त्याच क्रमांकावर नवे सिमकार्ड घेतले आहे. - एक न्यायाधीश (शिवाजीनगर न्यायालय)
मिरवणुकीमध्ये मोबाईल चोरट्यांची चंगळ
By admin | Updated: September 29, 2015 02:31 IST