पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारा तरुण सराईत मोबाईल चोरटा निघाला. कर्ज फेडण्यासाठी थेट मोबाईल चोरीचा मार्ग अवलंबित ५० हून अधिक मोबाईलची चोरी केल्याचे समोर आले. बिबवेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत १ लाख ८८ हजारांचे २१ मोबाईल जप्त केले आहेत.
तानाजी शहाजी रणदिवे (वय ३३, रा. शांतीनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मोबाईल चोरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे आणि गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गंगाधाम रोडवर चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सतीश मोरे यांना मिळाली. त्यामुळे पथकाने सापळा रचून नागरिकांना मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करणाऱ्या तानाजी रणदिवे याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे सहा मोबाईल आढळून आले. चौकशीत त्याने पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करीत असल्याचे सांगितले. कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरातून मोबाईलची चोरी करीत असल्याची कबुली दिली. तब्बल ५० हून अधिक मोबाईल चोरून अनोळखी व्यक्तींना विकल्याचे त्याने सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, राहुल शेलार यांनी केली.
----