पुणे : मोटारसायकल घसरून चालक खाली पडून जखमी झाला असताना, त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने एका चोरट्याला अटक केली आहे. ईश्वर दगडू भडकवाड (रा. जय मल्हार अपार्टमेंट, दांडेकर पूल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. हा प्रकार सातारा रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता.
याप्रकरणी सागर नवघने (वय ३१, रा. श्रीनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सागर नवघने हे मोटारसायकलवरून जात असताना १० जून रोजी सायंकाळी त्यांची मोटारसायकल घसरून पडले होते. ते पडलेले पाहून काही जण धावून आले. त्यात ईश्वर भडकवाड याने ते खाली पडल्याचे पाहून त्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारून चोरून नेला होता. अपघातानंतर आपला मोबाईल चोरीला गेल्याची नवघने यांच्या लक्षात आले. त्यांनी पुणे पोलीस दलाच्या वेबसाईटवर लॉस्ट ॲन्ड फाऊंडवर मिसिंगची तक्रार दाखल केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाकडून अशा मिसिंग मोबाईलचे ट्रेसिंग करण्यात येत होते. ईश्वर भडकवाड याने काल चोरलेला मोबाईल सुरू केला. त्याबरोबर युनिट-२ च्या पथकाने त्याला पकडले. पोलिसांनी सागर नवघने यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक घाडगे अधिक तपास करीत आहेत.