पुणो : पौड रोडवरील कोथरूड बस डेपो चौकात रस्ता ओलांडताना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रस लक्षात घेऊन या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या भुयारी मार्गाची जागा स्थायी समितीत बदलली गेल्याने मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आमने-सामने आली आहे. हा मार्ग बदलण्याची उपसूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंडू केमसे यांनी दिली होती. दरम्यान, हा मनमानी कारभार चालू देणार नाही, असे स्पष्ट करत प्रशासनाने हा भुयारी मार्ग इतरत्र हलविल्यास त्याला विरोध केला जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. तसेच स्थायी समिती अध्यक्षांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करावी आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या भागात भुयारी मार्ग आवश्यक असल्याचा अभिप्राय सल्लागार समितीने दिल्यानंतर प्रशासनाने येथे भुयारी मार्गाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र, स्थायी समितीत या भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक केमसे यांनी उपसूचना देऊन हा भुयारी मार्ग शंभर मीटर चांदणी चौकाकडे करण्याचा प्रस्ताव मांडून तो मान्य करून घेतला आहे. या नवीन ठिकाणी भुयारी मार्ग झाल्यास त्याचा कोणताही फायदा नागरिकांना होणार नसल्याचे या भागातील मनसेचे माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाने मनमानी करून या भुयारी मार्गाचे काम सुरू केल्यास मनसेचा त्याला तीव्र विरोध राहील. कोणत्याही स्थितीत हा मार्ग होऊ
देणार नाही, असा इशारा गोरडे यांनी आज दिला आहे. (प्रतिनिधी)
कोथरूड बसडेपो चौकातून नागरिकांना सुरक्षितपणो रस्ता ओलांडता यावा, यासाठी पालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी या परिसराची पाहणी केली होती. या परिसरात भुयारी मार्गाची किती आवश्यकता आहे, यासाठी सल्लागार समितीची नेमणूक करून त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता.