पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या नव्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या महिल्या उपाध्यक्ष म्हणून भाजपाच्या डॉ. किरण मंत्री यांची आज बिनविरोध निवड झाली. भाजपाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांना मान मिळाला. आज सकाळी सुरू झालेल्या सभेत सामाजिक न्यायमंत्री व कँटोन्मेंटचे भाजपाचे आमदार दिलीप कांबळे यांनी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीवकुमार यांना डॉ. मंत्री यांच्या नावाची भाजपाच्या प्रदेश शाखेकडून आलेली चिठी दिली. मात्र संजीवकुमार यांनी नियमानुसार निवडणूक घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले.भाजपाच्या प्रियंका श्रीगिरी, दिलीप गिरमकर, अतुल गायकवाड, विवेक यादव या सर्वांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज देण्यात आले. या सर्व सदस्यांनी अर्जावर डॉ. मंत्री यांचे नाव लिहिल्याने डॉ. मंत्री यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर ए.के. त्यागी यांनी आगामी सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होईल, असे सांगितले. डॉ. किरण तुषार मंत्री घोरपडी बाजार वॉर्ड क्र.७ मधून २१३२ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांचे आप्त श्रीकांत मंत्री २० वर्षे बोर्डाचे सदस्य होते. गेल्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या सदस्यांनी महिला सदस्यास उपाध्यक्षपदी संधी देण्यास मान्यता दिली होती. तेव्हापासून प्रियंका श्रीगिरी व डॉ. मंत्री यांच्यात उपाध्यक्षपदासाठी सुप्त स्पर्धा सुरू झाली होती. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी डॉ. मंत्री यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचे समजल्यानंतर डॉ. मंत्री यांची निवड निश्चित मानली जात होती. अखेर त्यांची आज निवड झाली. (प्रतिनिधी)केंद्राकडून निधी मिळविणार४ डॉ. किरण मंत्री प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या, बोर्डाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने केंद्र शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. कँटोन्मेंट परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर व विकासकामे करण्यावर भर राहणार आहे.
कँटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी मंत्री
By admin | Updated: March 3, 2015 01:19 IST