पुणे : भारतातील उत्तर, उत्तर पश्चिम, मध्य भारतातील बहुतांश विभाग आणि पूर्व भारतातील काही भागात किमान तापमान डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या वतीने डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा दीर्घ कालीन अंदाज रविवारी जाहीर केला.
मॉन्सून मिशन अंतर्गत पावसाबरोबरच आता अन्य ऋतुमधील अंदाज जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार देशातील ३४ हवामान विभागातील तापमानाचा अभ्यास करुन हे अंदाज जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान किमान तापमान हे सरासरीपेक्षा किंचित कमी असेल. मराठवाडा व विदर्भात सरासरीपेक्षा किमान तापमानात घट होईल. कोकणात मात्र किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
कोकणात कमाल तापमान हे अधिक राहण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत कमी असेल. त्याचवेळी विदर्भात कमाल तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. गेल्या २४ तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व कोकण, गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
पुण्यात किमान तापमानात मोठी वाढ
पुणे शहरात किमान तापमानात आज पुन्हा मोठी वाढ झाली. रविवारी सकाळी शहरात किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती. सरासरीच्या तुलनेत ही वाढ ७,८ अंश सेल्सिअस इतकी असून राज्यात ती सर्वाधिक आहे.