याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. पुण्याहून एक टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस कोल्हापूरला निघाली होती. या वेळी गाडीच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाले. बोगद्याच्या बाहेर शिंदेवाडी गावच्या हद्दीत आल्यावर गाडीच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाला दिसले. त्याबरोबर प्रसंगावधान राखून ताबडतोब चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली आणि गाडीतील सर्व प्रवासी खाली उतरले. काही वेळातच गाडीने पेट घेतला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेची माहिती मिळताच शिंदेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक दलाला कळवले. तोपर्यंत नवीन बोगद्यातून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. सुमारे पंधरा मिनिटांत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. सुमारे पंधरा मिनिटांत त्यांनी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली.