पुणे : घराघरांत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाला पाचव्या दिवशी वाजतगाजत निरोप देण्यात आला. गणपतीबरोबरच गौराईचेही विसर्जन करण्यात आले. गणेशविसर्जनासाठी सायंकाळनंतर भक्तांनी गर्दी केली होती. गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवसाने, पाचव्या तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. पाचव्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा केल्यानंतर लहानथोरांनी गणरायाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत तरुण मंडळी गटागटाने जात होती.सायंकाळनंतर विसर्जन घाटाकडे येण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यामुळे नदीकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शहरातील नदीकाठी महापालिकेतेर्फे गणेशविसर्र्जनाची खास सोय करण्यात आली होती. विसर्जनासाठी हौद उभारण्यात आले आहेत. नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून अनेकांनी या हौदात गणेशाचे विसर्जन केले. तर, काहींनी नदीतील वाहत्या पाण्यात विसर्जन केले. तत्पूर्वी, येथेही विधिवत गणेशाची पूजा करण्यात येत होती. घरातही बादलीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले. सोसायट्यांमध्ये बसविण्यात आलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. काही सोसायट्यांनी ढोलपथकाच्या साह्याने वाजतगाजत मिरवणूक काढली.गणेशविसर्जना वेळी भाविकांना सहकार्य करण्यासाठी अग्निशामक विभागातर्फे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही स्वयंसेवक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सूचना देताना दिसत होते. नदीपात्रात कुणी उतरू नये, यासाठी ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले होते.निर्माल्य नदीपात्रात टाकले जाऊ नये म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे निर्माल्य संकलित करण्यात येत होते. (प्रतिनिधी)
पाच दिवसांच्या गणरायाला निरोप
By admin | Updated: September 22, 2015 03:24 IST