पुणे : ‘मॉर्निंग वॉकला जात चला,’ असे टिष्ट्वट सनातन संस्थेचे कायदे सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याबाबत केले होते. हा सल्ला की धमकी, याबाबत चर्चा सुरू असतानाच सबनीसांनी सोमवारी ‘मॉर्निंग वॉक’ला जाऊन पुनाळेकर यांना प्रत्युत्तर दिले.डॉ. सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे पुनाळेकर यांचे हे टिष्ट्वट म्हणजे धमकी तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशलिस्ट पार्टी, राष्ट्र सेवा दल आणि आरोग्य सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुणे स्टेशनजवळील महात्मा गांधी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मॉर्निंग वॉक केला. ‘सनातन’चे वकील संजीव पुनाळेकरांचा धिक्कार असो, मुस्कटदाबी चालणार नाही, असे फलक झळकावून निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. (प्रतिनिधी)मी विधानावर ठाम : मी माझ्या विधानावर ठाम आहे. आपण कोणाच्याही धमकीला घाबरत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संमेलनाला यावे, असा आपला आग्रह आहे. माझे म्हणणे पटत नसेल, तर निषेध करा, हवे तर माझा पुतळा जाळा; पण संमेलनाला या. हे संमेलन मराठीच्या श्वासाचे संमेलन आहे. त्याला आपण हजर राहावे, असे आवाहन डॉ. सबनीस यांनी केले.संमेलनाला गालबोट नको : या उत्सवाला गालबोट लावू नये, असे आवाहन सर्व डाव्या पुरोगामी व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. विचारांचे उत्तर विचारानेच दिले पाहिजे. संमेलन उधळून लावण्याची भाषा करणे हे अत्यंत असांस्कृतिक व असभ्यपणाचे लक्षण आहे. ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.
संमेलनाध्यक्षांनी दिले ‘मॉर्निंग वॉक’ने प्रत्युत्तर
By admin | Updated: January 12, 2016 04:18 IST