लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : देलवडी येथे अप्पासाहेब शेलार या शेतकऱ्याने विजेच्या भारनियमनावर उपाय शोधला आहे. ट्रॅक्टरवर पाठीमागे डिझेल इंजिन बसवून आपल्या शेतीसाठी विद्युतपंपाद्वारे पाणीपुरवठा केला आहे. मुळा-मुठा नदीमध्ये मुबलक पाणी असूनही मागील काही दिवसांपासून सलग भारनियमन होत आहे. दिवसातून ८ ते १२ तास भारनियमन होत आहे. याशिवाय जेव्हा वीज येते तेव्हापासून वारंवार लपंडाव होत असल्याचे चित्र आहे. दौंड तालुका हा जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस पिकवणारा तालुका म्हणून परिचित आहे. देलवडी गाव यास अपवाद नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळू लागले आहे. जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. परंतु मुळा मुठा नदीला मुबलक पाणी असूनही केवळ भारनियमनाअभावी पिके जळू नयेत, म्हणून शेलार यांनी हा प्रयोग केला आहे. यासंदर्भात अप्पासाहेब शेलार म्हणाले, की पिके जळू नयेत, म्हणून शेतातील चालू मेहनत बाजूला ठेवून ट्रॅक्टर नदीकाठी आणला. भारनियमनावेळी इंजिनने पाणी उपसले जाते. ही पद्धती डिझेलमुळे खर्चिक असली तरी गरजेची आहे.
भारनियमनावर शोधली उपाययोजना
By admin | Updated: May 11, 2017 04:14 IST