पिंपरी : स्वाइन फ्लूची तीव्रता दिवसेन््दिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरात आतापर्यंत २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात पुन्हा २००९प्रमाणे मास्क दिसू लागले आहेत. त्याचा काळाबाजार पुन्हा सुरू झाला आहे. मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. शाळेतील मुलांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. नागरिकही जिवाच्या भीतीपोटी मोठ्या प्रमाणात मास्क वापरताना दिसून येत आहेत. शासन स्तरावरून किंवा महापालिका प्रशासनाकडून स्वाइन फ्लूबाबत लवकर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. २००९मध्ये स्वाइन फ्लूने घातलेल्या थैमानाचा अनुभव पाठीशी असतानाही त्याबाबत शासन गाफील राहिले व त्यामुळे गोळ्यांचा तुटवडा जाणवला. त्यासाठी आधीच उपाययोजना करण्याची गरज होती. ती केली नाही. त्यामध्ये अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. प्रशासन सांगते, की तो विषाणू असल्याने त्याला रोखणे अवघड आहे. मात्र, प्रभावी उपाययोजनांमुळे आपण त्यावर मात तरी करू शकतो, हे प्रशासन विसरले व हवामानाला आणि विषाणूला दोष देण्यातच त्यांनी धन्यता मानली. स्वाइन फ्लूचा आजार काही नवीन नाही. त्याच्यावर प्रभावी औषधे, लसही उपलब्ध आहे. मात्र, जनजागृती करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. मोफत मास्कवाटप, औषधोपचार करण्याच्या सगळ्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्याप्रमाणे कोणत्याही रुग्णालयात उपचार करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांनाच या आजाराविरोधात लढा द्यावा लागत आहे. त्यासाठी मास्कचा आधार नागरिक घेत आहेत. (प्रतिनिधी)
मास्कचा काळाबाजार
By admin | Updated: March 13, 2015 06:28 IST