पुणे : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी दुर्घटनेतील आरोपींना तत्काळ शिक्षा करावी आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागण्यांसाठी मंगळवारी शहराच्या विविध भागांत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. येरवडा येथील पर्णकुटी पोलीस चौकीसमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. खडकीकडून येणारी वाहतूक कार्यकर्त्यांनी रोखून चक्का जाम आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी सकाळी दहा ते पंधरा मिनिटे रस्त्यावर बसून घोषणा दिल्या. त्यानंतर पोलीस चौकीच्या परिसरात राष्ट्रगीतानंतर शांततापूर्ण वातावरणात आंदोलनाचा समारोप झाला. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. दिघी मॅगझिन चौकात सकाळी ११ च्या सुमारास चक्का जाम आंदोलनास सुरुवात झाली. जय जिजाऊ, जय शिवाजीच्या घोषणा देत पुण्याहून आळंदीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. पोलिसांनी वाहतूक काही काळासाठी विरुद्ध दिशेने वळवली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे वाचन करण्यात आले. पुणे- सोलापूर महामार्ग अडविलापुणे-सोलापूर महामार्गावरही शेवाळवाडी येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अतिशय शांततेत आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्धा तास रास्ता रोको केले. परिमंडल ४ चे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनबारामती, इंदापूर, फलटण, मोरगाव, माळेगाव, पाटस, भिगवण या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदम गुरुकुलसमोर चक्का जाम आंदोलन केले. आंदोलनात युवावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. आंदोलनाला बावड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी इंदापूर-अकलूज येथेही आंदोलन करण्यात आले.चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम आंदोलन केले. आरक्षणासह विविध मागण्या असलेले फलक हातात घेऊन मराठाबांधवांनी दुपारी बाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्ग रोखला. आळेफाटा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलकांनी चौकात गोल मानवी रिंगण केले होते. घोडेगाव शहरातील महाराणी चौकातून मोर्चा निघाला व अहिल्यादेवी चौकात मंचर-भीमाशंकर रस्ता बंद करण्यात आला. पिंपरी-चिंचवड परिसरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा समाजबांधवांनी आंदोलन केले. म्हाडा गृहप्रकल्पाजवळ आले. तेथे सभा घेण्यात आली. या सभेत आंदोलकांनी समाजाची आंदोलन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. वाकड, भूमकरवस्ती येथे पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले. मराठा समाजबांधवांच्या विविध मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.
मराठा क्रांती मोर्चाचा चक्का जाम
By admin | Updated: February 1, 2017 05:09 IST