पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी सुरक्षा साधनांशिवाय धोकादायकरीत्या नालेसफाई करतात. ही बाब सफाई कामगार तक्रार निवारण समितीचे सदस्य सागर चरण यांनी अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग राज्य कार्यालय, आकुर्डी येथील सहायक संचालक अनुराधा घोडखांदे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागास नोटीस दिली आहे.मैलासांडपाण्याच्या ठिकाणची सफाई मनुष्यबळाचा वापर न करता, यांत्रिकी पद्धतीने करावी, असे न्यायालयाचे आदेश असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सफाई कर्मचाऱ्यांना नालेसफाई करण्यास भाग पाडले जाते. कोणतीही सुरक्षा साधने न वापरता जोखीम पत्करून कामगार मैलासांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये काम करतात. आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरत असताना, महापालिकेकडून त्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली जात नाही. दापोडीत ड्रेनेजचे झाकण उघडून आत उतरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. गळाभर मैलासांडपाण्यात काम करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले वास्तववादी छायाचित्र चरण यांनी आयोगाकडे सादर केले होते. (प्रतिनिधी)
अनुसूचित जाती, जमाती आयोगाची मनपास नोटीस
By admin | Updated: June 12, 2014 05:10 IST