नीलेश काण्णव, घोडेगावनिसर्गाच्या कोपाने जगाच्या पाठीवरुन पुसल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला सहा महिने झाले असतानाही या गावाच्या पूनर्वसनाचा तिढा अद्याप कायम आहे़ प्रशासनाच्या वतीने पर्यायी जागेच्या शोधाचा प्रयत्न सुरु आहे़ ग्रामस्थांचे प्रशासनाला आवश्यक तेवढे सहकार्य न मिळाल्याने जागेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही़ दुर्घटना ३० जुलै रोजी सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामध्ये १५१ लोक दगावले. या दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होत आहेत. बचावलेले माळीण ग्रामस्थ धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांना सावरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. शासनाने ११ कोटी २८ लाख रुपयांचे वाटप आत्तापर्यंत केले आहे. तसेच, ४० तात्पुरती निवारा शेड बांधून दिली आहेत; मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रशासन सुरुवातीपासून खूप प्रयत्न करीत आहे. मुळात माळीण गाव व त्याचा परिसर पाहिला असता, सर्व उंच डोंगराळ भाग आहे. त्यामुळे पुनर्वसनासाठी सपाटीची, सुरक्षित व लोकांच्या सोईची जागा मिळणे अवघड. तसेच, माळीणचे पुनर्वसन केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा असे घडू नये. यासाठी जीएसआयला जागा दाखवून त्यांची मान्यता घेणे महत्त्वाचे. माळीणचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी सप्टेंबर २०१४ मध्ये झांजरेवाडी, कोकणेवाडी व अडिवरे या तीन जागा पाहण्यात आल्या. यापैकी झांजरेवाडी व कोकणेवाडी जागेला जागा मालकांनी संमती दिली, तर अडिवरेची जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. झांजरेवाडी जागेला जीएसआयने मान्यता दिली, तर कोकणेवाडीची जागा लांब असल्याने माळीण ग्रामस्थांनी या जागेला नकार दिला.
माळीणला अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा
By admin | Updated: January 30, 2015 03:31 IST