लोकमत न्यूज नेटवर्ककाटेवाडी : काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रभागरचना व आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. जाहीर झालेल्या सोडतीमध्ये पंधरा जागांपैकी आठ जागांवर महिला आरक्षण निघाले. त्यामुळे पुन्हा एकदा महिलाराजचे वर्ष राहणार आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी पूनम मराठे, सरपंच गौरी काटे, तलाठी भुसेवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष एकनाथ काटे, छत्रपतीचे संचालक प्रशांत काटे, जंगलकाका वाघ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे व ग्रामस्थ, युवावर्ग उपस्थित होते. ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सहा हजार नऊशे एक्काऐंशी आहे. पाच प्रभाग असून, पंधरा सदस्य संख्या आहे. यापैकी आठ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. अनुसूचित जातीसाठी चार जागा, नागरिकांचा मागासप्रवर्ग चार जागा, सर्वसाधारण महिला चार जागा, तर सर्वसाधारण पुरुष तीन जागा अशा पंधरा जागांवर आरक्षण काढण्यात आले.प्रभागात आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी ‘थोडी खुशी, थोडी गम’ अशी अवस्था आहे.
काटेवाडीत येणार महिलाराज
By admin | Updated: June 30, 2017 03:31 IST