केडगाव : केडगाव (ता. दौंड) येथील महावितरणच्या विभागीय व उपविभागीय कार्यालयास मनसेचे कार्यकर्ते तसेच कानगाव ग्रामस्थांनी आज टाळे ठोकून कर्मचार्यांना आतमध्ये कोंडून ठेवले. केडगाव येथील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू तसेच कानगाव येथील विद्युत रोहित्र देण्यास दिरंगाई, या कारणामुळे शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यासंदर्भात दौंड मनसेचे तालुकाध्यक्ष राजाराम तांबे म्हणाले की, गुरुवारी कानगाव येथील शेतकर्यांना जळालेल्या रोहित्राऐवजी शुक्रवारी नवीन रोहित्र देतो, असे आश्वासन अधिकार्यांनी दिले; परंतु आज प्रत्यक्षात रोहित्र मिळाले नाही. याशिवाय केडगाव येथे विद्युततारा तुटल्या आहेत. खुटबाव येथील एका कुटुंबाच्या घरावर विद्युतखांब कोसळला आहे. बाजारपेठेत गुरुवारी रात्री विद्युततार तुटली. यामध्ये एका मुलीचा जीव वाचला. महावितरणच्या गलथान कारभाराने सतीश जगताप या युवकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी नितीन जगताप, सलमान खान, सोनू नलावडे, दादा जगताप, हर्षल बारवकर मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
‘महावितरण’ला ठोकले टाळे
By admin | Updated: May 31, 2014 07:18 IST